पुणे | क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आयुक्तांचे पाठबळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी असलेल्या महापालिका सहायक आयुक्त (क्षेत्रीय अधिकारी) यांच्या अधिकारात महापालिका आयुक्तांकडून वाढ करण्यात आली आहे.
आता क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सुरू असलेल्या कोणत्याही कामाचे त्यांना पर्यवेक्षण करता येणार असून, त्या- त्या भागाचे ते नोडल ऑफिसर (समन्वय अधिकारी) असणार आहेत.
त्यामुळे मुख्य खात्यांकडून सुरू असलेल्या कामांवरही त्यांना लक्ष ठेवता येणार आहे. यापूर्वी मुख्य खात्याकडून सुरू असलेल्या कोणत्याही कामाची जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती अथवा संबंधित कामाबाबत तक्रारी आल्यास त्याबाबत तपासणी अथवा कारवाई करण्याचा अधिकारही त्यांना नव्हता. मात्र, आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडून त्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत.
म्हणून वाढविले अधिकार…
महापालिकेचे भौगोलिक कार्यक्षेत्र हे ५ परिमंडळ उपआयुक्त कार्यालय व १५ महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांमध्ये विभागले गेले आहे.
त्यात ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेनुसार प्रत्येक विभाग कामकाज पाहतो. मात्र, मुख्य खात्याकडून शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये काही चुका, अडचणी असल्यास नागरिक, तसेच लोकप्रतिनिधी क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधतात.
मात्र, क्षेत्रीय कार्यालयाकडून ज्या कामांची अंमलबजावणी मुख्य खात्यांकडून केली जाते, अशा कामांबाबत मुख्य खात्याकडे संपर्क साधावा, असे सांगितले जाते.
मुख्य खात्याकडून करण्यात येणाऱ्या कामांचे पर्यवेक्षण करणारे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, निविदादार, ठेकेदार हे क्षेत्रीय कार्यालयाच्या सूचनांना प्रतिसाद देत नाही व सूचनांची दखल घेत नाहीत, अशी तक्रार क्षेत्रीय कार्यालयांकडून केली जाते.
त्यामुळे महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या विविध कार्यालयांमध्ये असमन्वय असल्याचे चित्र तयार होते व समस्यांचे निराकरण न झाल्याने नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा महानगरपालिका प्रशासनाबद्दल रोष देखील वाढतो. ही बाब लक्षात घेऊन हे अधिकार वाढविण्यात आले आहेत.
काय आहेत आयुक्तांचे आदेश
सहायक आयुक्त समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील
त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच विभागांच्या कामांवर लक्ष ठेवतील
कामे, योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी ते जबाबदार राहतील
क्षेत्रीय कर्मचाऱ्यानी सहायक आयुक्तांच्या आदेशचे पालन करावे




