पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेली तीस वर्ष मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच वारकऱ्यांच्या पायांचे मसाज करणाऱ्या आणि पालखी गेल्यानंतर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्कार प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा महापालिका आयुक्त शेखर सिहं यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर भक्ती शक्ती ते पवळे उड्डाणपुलापर्यंत पिंपरी चिंचवड मनपा सोबत रस्ता स्वच्छता अभियान राबविले जाते. त्यांच्या बहुमूल्य सहकार्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेब यांनी संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर या संस्थेला प्रमाणपत्र देऊन गौरव केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड आणि सायली सुर्वे, संध्या स्वामी अनुषा पै, पल्लवी नायक यांनी सत्कार स्वीकारला. आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या भाषणातून संस्कार प्रतिष्ठान करीत असलेल्या पर्यावरण पूरक कामाचे कौतुक केले तर उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.