Pune News : स्वच्छ पुण्यासाठी आयुक्त मैदानात; ऑन ग्राउंड कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

पुणे : शहरात रात्रीच्या वेळी शहर स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून रात्रपाळीतील सुरक्षा यंत्रणा मजबूत केली जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या आॅन ग्राऊंड स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिले.
‘स्वच्छतेचा पुणे पॅटर्न’ ही विशेष मोहीम महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने सुरू करण्य़ात आली असून त्या अंतर्गत आयुक्त राम यांनी परिमंडळ क्र. ५ अंतर्गत आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील स्वच्छतेची सद्यस्थिती, घनकचरा व्यवस्थापनातील अडचणी, ऑन ग्राउंड कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांचा आणि उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ ५ चे उपायुक्त सुनिल बल्लाळ, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक आणि मोकादम यावेळी उपस्थित होते.
जाणून घेतल्या अडचणी
बैठकीदरम्यान मोकादमांनी प्रत्यक्ष कामकाजातील अडचणींची माहिती आयुक्तांना दिली. काही नागरिकांकडून असहकार्य, कचरा नियमानुसार न देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, तसेच झोपडपट्टी आणि अरुंद रस्त्यांमुळे कचरा संकलनात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख त्यांनी केला.
याशिवाय कचरा वाहतूक वाहनांची संख्या अपुरी असणे, पर्यायी गाड्या वेळेत न मिळणे, मनुष्यबळाचा तुटवडा आणि वयस्कर स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे कामाचा वेग कमी होणे या समस्याही मांडण्यात आल्या. अतिक्रमण आणि हातगाडी विक्रेत्यांकडून परिसरात अस्वच्छता वाढत असल्याचेही लक्षात आणून दिले. रात्रपाळीत काही ठिकाणी दमदाटी व असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो, अशी तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली.
या सर्व मुद्द्यांना गांभीर्याने घेत आयुक्त राम यांनी तातडीचे निर्देश दिले. त्यांनी कचरा वाहतूक वाहनांची संख्या वाढविणे, पर्यायी वाहने तत्काळ उपलब्ध ठेवणे, सकाळी वेळेत वाहनांचे नियोजन करणे, तसेच क्षेत्रीय पातळीवर मानवबळ व साधनसामग्रीचा समन्वय वाढविण्याचे आदेश दिले.
स्वच्छता कर्मचारी, मोकादम व अधिकारी यांनी नियोजनपूर्वक आणि एकत्रित प्रयत्नांनी काम करणे अत्यावश्यक आहे. अन्य शहरांशी तुलना न करता पुढील एका वर्षात पुणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून उभे करायचे आहे.
– नवल किशोर राम (महापालिका आयुक्त)





