दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका,’…फडतूस नाही म्हणायचे तर काय?’

मुंबई – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना, राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे म्हटले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. “इथून पुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात, तर तुम्हाला सोडणार नाही, याला धमकी समजा”, अशा शब्दांत बावकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
अशात आज ‘सामना’च्या अग्रलेखातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता भाजप त्यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्यांना फडतूस नाही म्हणायचे तर काय? शिवसेनेचा धनुष्यबाण भ्रष्ट मार्गाने काढून घेतला तरी बाण आरपार घुसलाच. आता तो कोणत्या भागात घुसला ते श्रीमान ‘बावन’ आण्यांनीच जाहीर करावे. काडतूस काय किंवा फडतूस काय, तुम्ही बिनकामाचे आहात. हेच सत्य आहे. तुमच्या भिजलेल्या काडतुसांचा प्रत्येक बार फुसकाच ठरेल, हे ध्यानात ठेवा. जनतेची ताकद हेच आमचे काडतूस आहे. तुम्ही सुडाची दारू काडतुसात भरून कितीही उडवायचा प्रयत्न केलात तरी ती तुमच्यावरच उलटेल. संगीता डवरे, शीतल गादेकर, रोशनी शिंदेंचे शाप तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीत.. !
आपण फडतूस नसून काडतूस असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाहीर केले आहे. ते काडतूस असतील किंवा आणखी काही, पण महाराष्ट्रावर एक फडतूस सरकार राज्य करीत आहे व या सरकारने महाराष्ट्राची सर्वच पातळय़ांवर अप्रतिष्ठा करायचा विडा उचलला आहे. राज्य सरकार किंवा ते चालवणारे फडतूस आहेत असे फक्त लोकांनाच वाटत नाही, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयासही वाटते. महाराष्ट्राचे सरकार ‘नपुंसक’ आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? ‘नपुंसक’ किंवा ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ या ‘बावन’ आण्यांनी समजून घेतला पाहिजे. शब्दकोश म्हणतो, ‘बिनकामाचे, निरर्थक म्हणजे फडतूस,’ पण ‘फडतूस’ शब्द कमळाबाईच्या आरपार घुसला. सत्य हे असेच टोकदार असते. हे टोकदार सत्य फडतूस सरकारच्या काळजात घुसले आहे. महाराष्ट्राची सध्या सर्वच बाजूंनी अधोगती सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा तर साफ मुडदा पडला आहे आणि ही भिजलेली काडतुसे आपल्याच मस्तीत दंग आहेत. या भिजलेल्या काडतुसांना संगीता डवरेंचे काय झाले याची माहिती होती काय? मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पत्नी संगीता डवरे यांची अखेर मृत्यूशी झुंज मंगळवारी संपली. भिजलेल्या काडतुसाला आपण गृहमंत्री असल्याचा सार्थ अभिमान आहे, पण स्वपक्षीय बावनकुळे व डोम कावळे यांना अभिमान असणे व महाराष्ट्राला तुमच्या पदाचा आधार वाटणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. 27 मार्च रोजी मंत्रालयाच्या दारात एकाच दिवशी तीन जणांनी
आत्महत्येचा प्रयत्न
केला. त्यातील धुळय़ाच्या शीतल गादेकर आणि नवी मुंबईच्या संगीता डवरे यांचा मृत्यू झाला. या दोन निरपराध महिलांनी सरकारच्या दारात आत्महत्या केली. विषप्राशन केले व सरकार स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी तडतडत बसले आहे. या दोन्ही महिलांवर नीट उपचारदेखील झाले नाहीत. संगीता डवरे व शीतल गादेकर यांच्या आत्महत्येची माहिती आपल्या ‘काडतूस’ गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे काय? शेतकरी ठिकठिकाणी आत्महत्या करीत आहेत, पण भिजलेल्या काडतुसांना त्यांची चिंता दिसत नाही. आपण फडतूस आहोत की भिजलेले काडतूस आहोत हे तुमचे तुम्ही ठरवा; पण गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी आहात. राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे हे महत्त्वाचे! राज्याचे काडतूस गृहमंत्री फडतूस भाषेत आरोळी ठोकतात, ‘‘मी काडतूस आहे… हम घुसेंगे.’’ साहेब, किधर घुसेंगे? एकदा काय ते स्पष्ट करा. तिकडे चीन अरुणाचलमध्ये एकदम आतमध्ये घुसला आहे. 11 गावांची नावे चीनने परस्पर बदलली. तरीही तुमचे भीमपराक्रमी पंतप्रधान चीनचे नाव घेऊन इशारा द्यायलाही तयार नाहीत. देशात दंगली घडवून हिंदू-मुस्लिम हा नेहमीचा खेळ हे सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत खेळत आहे. पाकिस्तानला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, पण आत घुसलेल्या चीनचे काय? चीनचे जे काडतूस आत घुसले आहे ते आधी तुमच्या त्या ‘बावन’ आण्यांना काढायला सांगा. मुळात हाताशी केंद्रीय यंत्रणा नसतील तर तुम्ही कोण? तुमचे कर्तृत्व काय? तुम्ही तुमच्या पायावर तरी उभे राहू शकाल काय? तुमच्या काडतुसाची दारू ही त्या केंद्रीय यंत्रणांची आहे. नाहीतर तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच आहात. ‘मातोश्री’वर चाल करून येण्याची भाषा ही भिजलेली काडतुसे करतात ती याच
केंद्रीय तपास यंत्रणांच्या
जोरावर. सीबीआय आणि ईडी या अंगरक्षकांची कवचे काढली तर तुम्हाला रिकाम्या पुंगळय़ांचीही किंमत उरणार नाही. खरे म्हणजे रस्त्यावरच्या मांजरांनाही घाबरून पळून जाणारे अशी तुमची ‘कीर्ती’ आहे. शिवसेनेमुळेच तुम्ही मर्द म्हणून ओळखले जाऊ लागलात. महाराष्ट्र हा मर्दांचा देश आहे. छत्रपती शिवरायांची ही माती आहे. अशा या मर्द देशावर तुमच्या राज्यकारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ‘नामर्दानगी’चा शिक्का बसला व राज्याची बेअब्रू झाली. त्याबद्दल या लोकांनी विष खाऊन मरायला हवे होते, पण विष खाऊन मेले कोण? संगीता डवरे आणि शीतल गादेकर. काय केले तुमच्या नामर्द आणि फडतूस सरकारने? डॉ. मिंधे गँगचे लोक ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात राजकीय अंडरवर्ल्ड चालवत आहेत. ही गुंडगिरी रोखण्याची हिंमत तुमच्या गृहखात्यात नसेल तर मर्दानगीची ‘काव काव’ बंद करा. तुमचे राज्य औटघटकेचे आहे व सध्या तुमची फुकट फौजदारी दिल्लीच्या जोरावर सुरू आहे. उद्या हे औटघटकेचे राज्यही जाईल व फुकट फौजदारीही जनता बरखास्त करील. महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्यांना फडतूस नाही म्हणायचे तर काय? शिवसेनेचा धनुष्यबाण भ्रष्ट मार्गाने काढून घेतला तरी बाण आरपार घुसलाच. आता तो कोणत्या भागात घुसला ते श्रीमान ‘बावन’ आण्यांनीच जाहीर करावे. काडतूस काय किंवा फडतूस काय, तुम्ही बिनकामाचे आहात. हेच सत्य आहे. तुमच्या भिजलेल्या काडतुसांचा प्रत्येक बार फुसकाच ठरेल, हे ध्यानात ठेवा. जनतेची ताकद हेच आमचे काडतूस आहे. तुम्ही सुडाची दारू काडतुसात भरून कितीही उडवायचा प्रयत्न केलात तरी ती तुमच्यावरच उलटेल. संगीता डवरे, शीतल गादेकर, रोशनी शिंदेंचे शाप तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीत!





