Pune News | सोयाबीन, उडीद, मूग खरेदीचा शुभारंभ

राजगुरूनगर, – नाफेड संस्थेकडून शासकीय आधारभूत किंमत योजने अंतर्गत हंगाम 2024-25 मध्ये उत्पादन झालेल्या सोयाबीन, उडीद आणि मूग या वाणांची खरेदी होणार आहे. खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघात मंगळवारी (दि. 19) यापैकी सोयाबीन पिकाची खरेदी सुरू करण्यात आली.
खेड तालुक्यात सोयाबीन पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. खरेदी-विक्री संघात नाफेडच्या निर्देशा नुसार होणार्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकर्यांना प्रति क्विंटल 4 हजार 892 रुपये भाव देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे लेखाधिकारी भास्कर जगदाळे यांनी यावेळी दिली. संघाचे अध्यक्ष नामदेव कलवडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष आनंदराव काळे, बाळासाहेब राळे, तिन्हेवाडी सोसायटीचे अध्यक्ष मधुकर सांडभोर आदी यावेळी उपस्थित होते.
सोयाबीनला 4 हजार 892 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव
नाफेड अंतर्गत होणार्या शेतकर्यांच्या पिकाला शासनाने सोयाबीनचा हमीभाव 4 हजार 892 रुपये, मूग 8 हजार 682 रुपये आणि उडीद 7 हजार 400 रुपये प्रती क्विंटल जाहीर केला आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी बँकेच्या आधार लिंक व बँकेचा खाते नंबर अपडेट पूर्ण नंबर असलेल्या पासबुकची झेरॉक्स, शेतकरी नोंदणी अर्ज संघाच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक प्रतापराव ऊर्फ नानासाहेब टाकळकर यांनी केले आहे.
चौकट : खेडमधील 500 शेतक-यांची नोंदणी.
खेड तालुक्यातील 500 शेतक-यांनी नाव नोंदणी केली आहे. प्रत्येक शेतकर्याला एकरी 520 किलो सोयाबीन येथील केंद्रात विक्रीसाठी आणता येणार आहे. खरेदी केलेल्या सोयाबीनची रक्कम 72 तासात पोर्टलद्वारे किंवा तांत्रिक अडचणी आल्यास 15 दिवसांच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे असे नाना टाकळकर यांनी सांगितले.
राजगुरूनगर : खेड तालुका खरेदी विक्री संघात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, नामदेव कलवडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.





