पुणे जिल्हा | तीर्थंकर मुनीसुव्रतनाथ मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ

पळसदेव, (वार्ताहर) – शनीग्रह अरिष्ट निवारक २७ फूट उंच तीर्थंकर मुनीसुव्रतनाथ मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
इंदापूर (जिल्हा पुणे) येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर प्रांगणातील शनीग्रह अरिष्ट निवारक २७ फूट उंच तीर्थंकर मुनीसुव्रतनाथ मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. हा अभिषेक सोहळा दि. १७ जूनपर्यंत सुरू राहणार आहेत.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, जैन धर्म हा प्राचीन श्रमण संस्कृतीचे प्रतीक असून हा समाज नेहमी धर्म सेवेबरोबरच राष्ट्रसेवेस सर्वोच्च प्राधान्य देतो. २७ फूट उंच तीर्थंकर मुनीसुव्रतनाथ भगवान यांची देश व राज्यातील खडगासन अवस्थेतील मूर्ती माझ्या मतदार संघात आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
युगल मुनीराज १०८ श्री अमोघकीर्ती महाराज व अमरकीर्ती महाराज यांचे जैन धर्म व देशासाठी महत्वपूर्ण योगदान असून जैन समाजास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
यावेळी अमोघकीर्ती महाराज म्हणाले, भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीमुळे इंदापूर नगरी ही पावन झाली असून ही नगरी म्हणजे प्रत्यक्ष इंद्राची इंद्रपुरी आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, सर्व विश्वस्त तसेच सकल जैन समाजाचा जैन धर्म प्रभावनेसाठी व प्रसारा साठीमहामस्तकाभिषेकाचा उपक्रम स्तुत्य आहे. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी या सोहळ्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
यावेळी मूर्तीच्या जलाभिषेकाचा मान अकलूज येथील डॉ. सतीश दोशी, महाअर्ग्य पूजेचा मान अमेरिकेतील साहील गांधी, दुग्ध अभिषेकाचा मान फलटण येथील विद्या व सुभाष शहा, नैऋत्य कलश व रक्त चंदन अभिषेकाचा मान पंढरपूर येथील अनुराधा व संजय व्होरा यांना मिळाला.
यावेळी एकूण ३३ प्रकारच्या मंगल द्रव्यांनी अभिषेक संपन्न झाला. सोहळ्यास अमेरिका, नागपूर, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून हजारो नागरिक उपस्थित होते. शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था, मुंबई येथील श्री वीर शासन प्रभावना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.





