अरबिंदो यांच्या जयंतीनिमित्त 150रुपयांचे नाणे व टपाल तिकिट जारी

नवी दिल्ली – अध्यात्मिक गुरु, विचारवंत श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. यावेळी मोदी म्हणाले की, या निमित्ताने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.
अरबिंदो यांची 150 वी जयंती संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक सोहळा आहे. त्यांची प्रेरणा आणि विचार आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देशाने हे वर्षभर खास साजरे करण्याचा संकल्प केला होता. यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, सांस्कृतिक मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जेव्हा प्रेरणा आणि कर्तव्य, प्रेरणा आणि कृती एकत्र येतात तेव्हा अशक्य उद्दिष्टे देखील अपरिहार्य होतात. आज देशाचे यश, देशाचे कर्तृत्व आणि स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात प्रत्येकाने प्रयत्न करण्याची जिद्द या गोष्टीचा पुरावा आहे. श्री अरबिंदो यांचे जीवन हे एक भारत श्रेष्ठ भारताचे प्रतिबिंब आहे. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला असला तरी, त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गुजरात आणि पुद्दुचेरीमध्ये घालवले. ते जिथे गेले तिथे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची खोल छाप सोडली.





