दिलासादायक ! राज्यात आतापर्यंत ४४ हजार रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : देशात एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरु असताना दुसरीकडे चांगली बातमी राज्यातुन समोर येत आहे. कारण राज्यात बुधवारी 1879 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 44 हजार 517 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 3254 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94 हजार 041 इतका झाला आहे. पैकी सध्या 46 हजार 074 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
बुधवारी झालेल्या 149 मृत्यूपैकी 66 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 18 एप्रिल ते 6 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 83 मृत्यूपैकी मुंबई 58, ठाणे 9, नवी मुंबई 5, जळगाव 4, उल्हासनगर 3, वसई विरार 2 तर अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याती प्रत्येकी एकाच मृत्यू झाला.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 93 हजार 784 नमुन्यांपैकी 94,041 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 69 हजार 145 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 27 हजार 228 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.





