दिलासा ! राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई – राज्यात काही दिवसांच्या तुलनेत करोनाच्या दैनंदिन आकडेवारीत आज मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील करोनाची रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली असून आज 2354 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात एकूण 1485 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1310 रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात आज दोन करोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,65,602 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झाले आहे.
राज्यात आज एकूण 24,613 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 14089 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5522 सक्रिय रुग्ण आहेत.




