पुणे | पावसाचे कमबॅक, पुण्याला झोडपले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरासह जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील सर्वच भागात दुपारी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पुणेकरांची एकच धांदल उडाली.
विशेषत: शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा फटका बसला.
शहराच्या मध्यवर्ती भागात बाराच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे नारायण पेठ, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, दारूवाला पूल, गणेश पेठ, सोमवार पेठ, जंगली महाराज रस्ता, आप्पा बळवंत चौक यासह अन्य परिसरात पाणी साचले.
काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. उपनगरांतील कोथरूड, वारजे, कात्रज, धनकवडी, वडगावशेरी, येरवडा, हडपसर, विश्रांतवाडी, औंध, पाषाण, बाणेर या भागांत जोरदार सरींमुळे ठिकठिकाणी पाणी साचले.
मेट्रो आणि पुलांच्या कामामुळे पाणी जाण्यासाठी जागाच नसल्याने गुडघाभर पाणी साचल्याच्या घटनाही समोर आल्या.
त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आणि कोंडीला सुरुवात झाली. दिवसभरात एक ते दोन पावसाच्या जोरदार सरी पडल्या. तर अधून-मधून हलक्या सरी सुरू होत्या.
त्यामुळे गारवा जाणवत होता. दिवसभरात खडकवासला – ११.४, वारजे – १४.८, कात्रज-आंबेगाव – २६.६ आणि डेक्कन परिसरात २७.६ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आशय मेजरमेंट्स या संस्थेने घेतली आहे.
आजही सतर्कतेचा इशारा
रविवारी (दि. २२) रात्रीपासून शहरात पावसाचे पुनरागमन झाले. सोमवारी (दि. २३) दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण आणि एक ते दोन पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, मंगळवारी पावसाचा आॅरेंज अलर्ट होता.
सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली आणि दुपारी जोर वाढला. पुढील दोन दिवस हवामानशास्त्र विभागाने शहरासह जिल्ह्यासाठी पावसाचा “रेड अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला. दि. २८ नंतर पावसाचा जोर कमी होईल, असेही हवामानशास्त्र विभागाने सांगितले.





