कर्जत तालुक्यात आ. राम शिंदे यांचा बोलबाला

कर्जत – कर्जत तालुक्यातील 8 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे व मित्रपक्षांचे वर्चस्व सिद्ध झाले. 8 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 6 ग्रामपंचायतीवर भाजप व मित्रपक्षांनी झेंडा फडकल्याने माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना धक्का दिला आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आले असून अनेक प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले आहे. अनेक ठिकाणी गावनेत्यांच्या पॅनेलला मतदारांनी जोर का झटका दिला असून तरुणांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. तालुक्यातील 8 ग्रामपंचायत मतमोजणीला मंगळवारी सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयात सुरुवात झाली. प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली होती. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले होते.
विजयी उमेदवारांची यावेळी गुलाल उधळत व फटाक्यांची आतषबाजी करत विजयी मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील कौडाणे ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत पहावयास मिळाली. यामध्ये सरंपचपदी प्रमोद रावसाहेब सुद्रीक यांनी बाजी मारली आहे. तसेच मुळेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील तिरंगी लढत झाली.
या निवडणुकीत शितल दत्तात्रय मुळे यांची सरपंचपदी निवड झाली. अळसुंदे ग्रामपंचायत निवडणुकीत स्मिता जिजाबापू अनारसे या सरपंचपदी विजयी झाल्या. कोपर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शांतीलाल दत्तू सुद्रीक यांची सरपंचपदी निवड झाली. बहिरोबावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांच्या सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या तसेच राहिलेल्या तीन जागा व सरपंचपदाच्या निवडीत कोमल शरद यादव (1299) यांनी बाजी मारली. कापरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी अनिल अशोक खराडे (1165) हे विजयी झाले. म्हाळंगी/शेगुड/डोंबाळवाडी या ग्रामपंचायत निवडणुकीत चौरंगी लढत पहावयास मिळाली. सरंपचपदी शांतीलाल नारायण मासाळ विजयी झाले. निंबे ग्रामपंचायत निवडणुकीत बाळूबाई बाबासाहेब कोपनर हे सरपंच म्हणून विजयी झाले.
काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप लढत
ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आमदार राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. आमदार शिंदे व आमदार पवार हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याने भाजप व राष्ट्रवादीमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष पहावयास मिळत आहे. तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे काही गावामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा तर भाजप विरुद्ध भाजप असा कार्यकर्त्यांचा सामना पहावयास मिळाला. काही गावात उमेदवार पाडण्यासाठी शहकटशहाचे राजकारण पहावयास मिळाले.
कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांची सत्ता संपुष्टात
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब साळुंके यांच्या नेतृत्वाखालील मरीमाता जनसेवा पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. मरीमाता ग्रामविकास पॅनेलने बाजी मारल्याने साळुंके गटाची 15 वर्षाची सत्ता संपुष्टात आली. तरुणांनी ही निवडणूक हातात घेतल्याने प्रस्थापितांना धूळ चारली आहे. जिल्हा बॅंकेत पराभव झाल्यानंतर आ. रोहित पवार यांच्याशी सलगी करून त्यांनी जिल्हा बॅंकेत तज्ज्ञ संचालकपद मिळवले. मात्र त्यांचे नेतृत्व आता गावानेही नाकारले आहे.





