अहमदनगर – आ. पाचपुतेंना वर्षभरात तिसरा धक्का!

काष्टीत गड आला पण ‘सिंह’ गेला
समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – काष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुलगा प्रतापसिंह पाचपुते यांच्या पराभवामुळे आमदार बबनराव पाचपुते यांना वर्षभरात तिसरा राजकीय धक्का बसला असून त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बेलवंडीत अण्णासाहेब शेलार यांनी मुलगा ऋषिकेश याला सरपंच करीत त्याचे लॉंचिंग केले.
काष्टीच्या निवडणुकीत आ.पाचपुते यांचे पुतणे साजन सदाशिव पाचपुते यांनी स्थानिक विरोधी गटाशी हातमिळवणी करीत पाचपुतेंच्या विरोधात मंडळ उभारले होते. या निवडणुकीत आ. पाचपुते गटाने सतरापैकी दहा जागा जिंकत बहुमत मिळवले. परंतु, सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते यांनी प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांचा 190 मतांनी पराभव करीत आ. पाचपुते गटाला मोठा धक्का दिला. शिवाय त्यांनी सात जागाही खेचून आणल्या. साजन पाचपुते यांनी योग्य पद्धतीने निवडणूक हाताळली, शिवाय त्यांना पाचपुते विरोधकांची मोठी मदत झाली.
प्रतापसिंह पाचपुते यांचा पराभव पाचपुते गटाच्या जिव्हारी लागला आहे. नागवडे कारखाना निवडणुकीत प्रतिभा पाचपुते यांचा पराभव, काष्टी सेवा संस्थेच्या निवडणुकीत भगवानराव पाचपुतेंचा पराभव आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीतील मुलाच्या पराभवाने आ. पाचपुतेंना वर्षभरात सलग तिसरा धक्का बसला आहे. आ. पाचपुतेंचे राजकारण ‘बॅकफूट’वर चालल्याचा संदेश यानिमित्ताने गेला असून पाचपुते कुटुंबातून साजन पाचपुते यांचे नवे नेतृत्व समोर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बेलवंडीच्या मागील निवडणुकीत जेष्ठनेते अण्णासाहेब शेलार गटाला बहुमत मिळूनही सरपंचपद विरोधी गटाकडे गेले होते. यावेळी मात्र शेलार यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकली. मुलगा ऋषिकेश याला सरपंच करीत शेलार यांनी सरपंचपदाच्या मागील पराभवाचा वचपा काढला. या निवडणुकीत विरोधी गटातील बेबनावाचा फायदा घेत शेलार यांनी मुलाचे राजकीय लॉंचिंग केले. घोगरगावमध्ये ज्येष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी सरपंचपद आणि तेरापैकी अकरा जागा जिंकत मोठा विजय मिळवित मागील निवडणुकीतील पराभव धुवून काढला. पारगाव सुद्रीक येथे पंधरापैकी अकरा जागा जिंकत पाचपुते-नागवडे गटाने बहुमत मिळवले. मात्र सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुरेखा दत्तात्रय हिरवे विजयी झाल्या.
साजन पाचपुतेंच्या भूमिकेकडे लक्ष!
काष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. पाचपुते गटाकडून सरपंचपदाची उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात आल्याने साजन पाचपुते यांनी नागवडे गटाशी हातमिळवणी करीत सरपंचपद काबीज केले. मात्र भविष्यात ते चुलते आ. बबनराव पाचपुते यांच्याशी पुन्हा जुळवून घेणार की तालुकास्तरीय राजकारणातही साजन पाचपुते वेगळी चूल मांडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नागवडेंचा स्थानिक आघाडीवर भर
या निवडणुकीत भाजपचे आ. बबनराव पाचपुते गटाची पुरती पीछेहाट झाल्याचे दिसून आले. दहापैकी काष्टी आणि पारगाव सुद्रीक या दोनच ठिकाणी सरपंच पदासाठी पाचपुते गटाचे उमेदवार रिंगणात होते.या दोन्हीही ठिकाणी पाचपुते गटाच्या उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. तर नागवडे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याऐवजी स्थानिक आघाडी करण्यावर भर दिला. त्यामुळे या निवडणुकीत नागवडे गटाचाही प्रभाव दिसून आला नाही.





