पुणे जिल्हा | जागतिक शांततेसाठी विज्ञान- अध्यात्माची सांगड

लोणी काळभोर, (वार्ताहर)- जागतिक शांतता दिवस साजरा करीत असताना अनेक देशात युद्धाचे सावट पसरले आहे. युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येऊन जगात शांतता नांदावी यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी लागणार आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या वतीने विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, द पॉवर ऑफ वर्ल्डस फाउंडेशनच्या संस्थापक देबोरा सवाफ, डॉ. डीनीस क्वॉर्डा, जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी, प्रा. रूझान पश्चू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ. विश्वनाथ कराड होते. कार्याध्यक्ष राहुल कराड, एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, संसदेचे मुख्य समन्वयक व प्र. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पाडे उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले की, २१ व्या शतकात शांततेने जगू शकू का हा प्रश्न सातत्याने निर्माण झाला आहे. सध्याच्या काळात मशीन आणि मनुष्य अशी जोडी भयानक वाटत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाला. त्यामुळे भविष्यात शांततेबाबत चिंता वाटते.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, जगात शांतता नांदावी ही आता काळाची गरज आहे. जगाच्या परिस्थितीकडे आपण पाहिल्यास संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी यांचे विचार अंमलात आणावे.
आपल्या विचारातून आळंदी, अयोध्या, अजमेर या शहरांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला वर्ल्ड पीस डोममध्ये सुरू असलेल्या संसदेचा नक्कीच फायदा होणार आहे.
देबोरा सवाफ म्हणाल्या की, शांतता आणि एकात्मिकता प्रस्थापित करणे सर्वांची जबाबदारी आहे. मुलांना शाळांमधून ’इमोशनल इंटेलिजन्स’ शिकवण्याची गरज आहे. युद्धाच्या छायेत जगणा-या व्यक्तींनी आता तंत्रज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर विचार करावा.
राहुल कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता विकसित करायची आहे. यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याला वाईट प्रवृत्तींकडून चांगल्याकडे जाण्याचा प्रयत्न अशा संसदेतून करायचा आहे.
यावेळी ज्येष्ठ खासदार डॉ. करण सिंह, डॉ. टोड क्रिस्तोफरसन यांनी दृकश्राव्य माध्यमातून शांततेसंदर्भात विचार मांडले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागत तर सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले.
महात्मा गांधीहकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता
डॉ. माशेलकर म्हणाले की, जागतिक शांततेच्या दिनी इराणने इस्त्राइलवर २०० मिसाईल डागली. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत जागतिक शांतता दिवस कसा साजरा करू शकतो.
उच्च शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाला अधिक महत्व दिले आहे. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे कठीण झाले आहे.
अशावेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून नवी पिढी घडवू शकतो. अध्यात्म हे अनुभवांवर आधारित असून त्यातून आत्मिक आणि मानसिक शांतता मिळते. वर्तमानकाळात दलाई लामा, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.





