काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

डॉ. राजू गुरव
पुणे – खासगी क्लासशी सलंग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसत आहे. खासगी क्लास विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेलेली असतात. दुसरीकडे विद्यार्थीच नसल्याने महाविद्यालये ओस पडल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, यासाठी महाविद्यालयांना विद्यार्थींच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली बंधनकारक करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अनेकदा पोकळ घोषणा करण्यात आल्या आहेत.
अभियांत्रिकी, वैद्यकीय व अन्य व्यावसायिक क्षेत्रांतील करिअर करण्याच्या अनुषंगाने जेईई, नीट, सीईटी या विविध प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खासगी क्लासचालकांनी आपली दुकाने थाटली आहेत. दोन वर्षांसाठी अडीच ते चार लाखांपर्यंतीची फी त्यांच्याकडून घेतली जाते. विद्यार्थीही भरमसाट फी भरून अशा क्लासमध्ये प्रवेश घेतात अन् नियमितपणे उपस्थितीही लावतात.
यंदाही विद्यार्थ्यांचा कला, वाणिज्य या शाखांपेक्षा विज्ञान शाखेकडे अधिक कल दिसून येत आहे. बहुसंख्य गुणवंत विद्यार्थी इयत्ता अकरावीला प्रवेश घेताना मोठ्या व नामांकित महाविद्यालयांऐवजी छोट्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास पसंती देतात. प्रवेश कुठे घ्यायचा, हे क्लासवालेच विद्यार्थी, पालकांना सांगतात व टायअप असलेल्या महाविद्यालयात प्रवेश प्रवेश प्रक्रियाही पूर्ण करून देतात. महाविद्यालयात नावापुरता प्रवेश अन् हजेरी मॅनेज करायची जबाबदारीही क्लासकडूनच घेतली जाते.
विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने शिकविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बहुसंख्य महाविद्यालयांतील शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
जेवढे दाम तेवढेच काम!
अनेक महाविद्यालयांत हंगामी शिक्षकांची भरती करून कामकाज ओढले जात आहे. विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना पुरेसा पगार मिळत नाही. त्यामुळे तेही जसे जमेल तसे शिकवतात. जेवढे दाम तेवढेच काम, अशी अवस्था या शिक्षकांची असते. त्यामुळे महाविद्यालयात शिक्षक नीट मन लावून शिकवत नाहीत. महाविद्यालयातील काही शिक्षक खासगी क्लासमध्ये चांगले शिकवतात. त्यामुळे खासगी क्लास लावण्याशिवाय पर्याय नसल्याचा विद्यार्थी, पालकांतून सूर आहे.
तपासणीसाठी मुहूर्त मिळेना
खासगी क्लासशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्याबाबत शिक्षण विभागातील संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी अशा बड्या अधिकाऱ्यांनी अनेकदा घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र तपासणी व कारवाई करण्याबाबत त्यांना मुहूर्तच सापडत नसल्याची अवस्था आहे. बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या सूचनाही महाविद्यालयांना अनेकदा दिल्या; परंतु महाविद्यालयांकडून त्याची सक्षमपणे अंमलबजावणी केली जात नाही.





