पुणे | जिल्हाधिकारी सुहास दिवसे; प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणूक प्रक्रिया कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये मिरवणूक, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे,
निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर नियंत्रित करण्याबाबत, तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांचा ताफा, दालनातील उपस्थितांची संख्या यावर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध जारी केले आहेत.
विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका दंडाधिकारी कार्यालय,
तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने, त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने आचारसंहितेस बाधा आणणारे कृत्य करण्यास बंदी घातली आहे.
या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनिक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही.
सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही, तसेच प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, वाहन फिरत असताना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशानुसार उमेदवारांना जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. त्याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही,
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करताना वेळेस मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.




