Cold Wave : उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट उसळली; नंदुरबारमध्ये तापमान 3 अंशावर

नाशिक – उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट उसळली असून, नंदुबारमधल्या अक्कलकुवा येथे तापमान चक्क 3 अंशावर गेले. सातपुडा पर्वत रांगातल्या अनेक गावांमध्ये भांड्यातल्या पाण्याचा बर्फ झालेला पाहायला मिळाला. मध्यरात्रीनंतर दवबिंदू गोठल्याने त्याचा ठिकठिकाणी बर्फ झाला. दुसरीकडे नाशिकमध्येही गारठा वाढला आहे. येणारे काही दिवसही थंडीचे राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थानाकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट आल्याचे दिसत आहे. यामुळे गहू, हरभरा, द्राक्ष आणि काढणीला आलेल्या लाल कांद्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. साधारणतः आणखी दहा दिवस हा कडाका राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील इतर शहरांच्या तापमानात 1 ते 3 अंशांपर्यंत कुठे वाढ तर कुठे घसरण दिसून आली. यवतमाळचे कमाल तापमान 7 अंशांनी घसरले. त्यानंतर चंद्रपूर 6 अंश म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई, कुलाबा, गोंदिया, नागपूर, वर्ध्याच्या तापमानात 5 अंशांची घसरण दिसून आली.औरंगाबाद शहराचे तापमान सोमवारी एकाच दिवसात 5 अंशांनी घसरले. सोमवारी हे तापमान 11 अंशांवर पोहोचले. थंडीचा कडाकाही वाढला.
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊसही झाला. थंड वारे, बाष्प, उष्ण हवा, आर्द्रता आणि कमी दाबामुळे विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. येत्या 14 जानेवारीपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची तसेच फळबागांची आणि नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





