Pimpri | थंडीमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले

कामशेत, – मागील आठवडाभरापासून थंडी वाढली आहे. त्यातही दोन दिवसांपासून थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे. या वाढत्या गारठ्यामुळे आणि वातावरणीय बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे सर्दी व खोकला याचे रुग्ण वाढले असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
थंडीचा ऋतू नुकताच कुठे सुरु होतोय, त्यात वातावरणीय बदलामुळे रुग्ण संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. वातावरणातील बदलामुळे घरोघरी थंडी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिला यांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात अशा रुग्णाची संख्या अधिक दिसत आहे.
अनेक नागरिक थेट दवाखान्यात जाण्याऐवजी मेडिकलमधून तात्पुरते सर्दी आणि खोकला यांच्या गोळ्या विकत घेत आहेत. परंतु हे योग्य नसून अधिक वेळ वाट न पाहता योग्य उपचार घ्यावेत, असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्दी, खोकला याप्रमाणेच अंगदुखीचे रुग्ण आणि दम्याचे रुग्ण यांचीही संख्या अधिक दिसून येत आहे.
थंडी वाढत असल्याने नागरिकांनी शक्यतो उबदार कपडे वापरावेत. पाणी गरम करून प्यावे व शीत पेयाचा वापर टाळावा. दम्याचे रुग्ण वाढत असून दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांनी तोंडाला मास्क लावावा व धुळीपासून संरक्षण करावे. तसेच सर्दी खोकला जास्त जात असेल त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य औषध उपचार घ्यावेत.
– डाॅ. बहिरट, आरोग्य अधिकारी, केंद्र कामशेत





