नाणे मावळ: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सुरु असलेली आदर्श आचारसंहिता सोमवारी (दि.२५) संपुष्टात आली. आचारसंहितेच्या काळात सरकारी अधिकारी, कर्मचारी वर्ग हा निवडणूक कामात व्यस्त असल्याने बहुतांश सरकारी कार्यालये बंद होती. परंतु आता आचारसंहिता संपल्याने कर्मचारी, अधिकारी वर्ग पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होत आहेत. तसेच नागरिकही आपली विविध प्रलंबित सरकारी कामे पुर्ण करण्यासाठी कार्यालयात येऊ लागल्याने ही कार्यालये गजबजल्याचे दिसत आहेत. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग, विद्यार्थी, व्यावसायिक आदीजण त्यांची रखडलेली सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी सध्या कार्यालयांत येत आहेत. त्यामध्ये रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला सारखे दाखले काढणे, जमिनीचे फेरफार, सातबारे उतारे काढणे आदी जमीनविषयक कामे यासह जमिनींच्या प्रलंबित केसेस आणि भूमि अभिलेख कार्यालयातील कामे मार्गी लावण्यासाठी नागरिक संबंधित कार्यालयांत गर्दी करीत आहेत. शहरी भागासह नाणे मावळ, पवन मावळ, आंदर मावळ आदी ग्रामीण ठिकाणचे विद्यार्थी, शेतकरी, नागरिक याकामासाठी मावळ तालुक्यातील महसूल क्षेत्र असलेल्या वडगाव शहरात येत आहेत. त्यामुळे वडगाव शहरातील पंचायत समिती चौक आणि परिसर सध्या नागरिकांच्या गर्दीमुळे गजबजलेला दिसत आहे. अधिकारी-कर्मचारी पुन्हा ऑफिसात विधानसभा निवडणुकीच्या कामात प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी साधारण महिनाभर व्यस्त होते. मागील अनेक दिवसांपासून अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी निवडणूक यंत्रणेत गुंतले असल्याने विविध कामे रखडून राहिली होती. अनेक शासकीय कार्यालयातील जनसामान्यांची कामे थंडावली होती. मात्र मतमोजणी आटोपल्यानंतर सोमवारपासून वडगाव मावळ येथील शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. सरकारी दप्तरी रखडलेली कामे मार्गी मंजूर असलेल्या घरकुलांच्या कामाचा निधी, सिंचन विहिरीचे अनुदान, गोठा बांधकाम आदी अनुदानाची कामे देखील आचारसंहिता काळात थांबली होती. तसेच तहसील कार्यालय अंतर्गत विविध कामे, दाखले मिळविणे, भूमी अभिलेख कार्यालयातील कामे प्रलंबित राहिली होती. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर सोमवारी, २५ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता संपली आणि सरकारी दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. सामान्यांच्या कामांना मिळणार गती अधिकारी वर्ग कामावर रुजू झाल्याने रखडलेल्या सरकारी कामांना आता गती मिळेल. आचारसंहिता काळात विविध योजनांतील तसेच शासकीय कार्यालयातील कामे प्रलंबित होती. आचारसंहिता संपल्यानंतर या कामाला नव्याने गती मिळणार आहे. त्यात पंचायत समिती, जिल्हापरिषद, तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडल कार्यालयातील कामांना गती मिळणार आहे.