Cockroach Janta Party : राजकारण फिरणार ! OBC चा ‘हा’ बडा नेता कॉकरोच जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार?
राज्यातील प्रस्थापित नेत्यांना आणि सध्याच्या राजकीय व्यवस्थेला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मी प्रसंगी 'कॉकरोच जनता पार्टी'चा (Cockroach Janta Party) सदस्य होण्यासही तयार आहे, असे खळबळजनक विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

Cockroach Janta Party : राज्यातील प्रस्थापित नेत्यांना आणि सध्याच्या राजकीय व्यवस्थेला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मी प्रसंगी ‘कॉकरोच जनता पार्टी‘चा (Cockroach Janta Party) सदस्य होण्यासही तयार आहे, असे खळबळजनक विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले असून, या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रस्थापित राजकारण्यांवर जोरदार निशाणा
माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी प्रस्थापित राजकारणी आणि धनदांडग्यांवर घणाघाती आरोप केले. ते म्हणाले “मी कॉकरोच जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) पूर्ण समर्थन करतो. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कोणताही मोठा कारखानदार किंवा धनदांडगा माणूस कधीच पुढे येणार नाही. ही लढाई देशातील आणि राज्यातील सामान्य तरुणाईलाच लढावी लागणार आहे. हीच तरुण पिढी प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देईल आणि या परिवर्तनाच्या लढ्यात मी या तरुणांसोबत जाण्यास पूर्णपणे तयार आहे.”
प्रस्थापित विरुद्ध बहुजन संघर्ष तीव्र होणार?
गेल्या काही काळापासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. प्रस्थापित राजकारण्यांमुळेच बहुजन आणि ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला आहे. त्यातच आता त्यांनी थेट ‘कॉकरोच जनता पार्टी’ला पाठिंबा जाहीर केल्यामुळे, आगामी काळात राज्यातील प्रस्थापित विरुद्ध बहुजन असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची पार्श्वभूमी?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना ‘झुरळ’ असे संबोधित केल्यानंतर, या वक्तव्याचा निषेध म्हणून अभिजीत दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (Cockroach Janta Party) स्थापना केली होती. स्थापनेनंतर अवघ्या काही तासांतच या पक्षाला सोशल मीडिया आणि तरुण वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
नुकत्याच झालेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणाविरोधात कालच अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
लढाई सुरूच राहणार: अभिजीत दिपके
दरम्यान, दिल्लीतील आंदोलन यशस्वी करून आजच अभिजीत दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. “विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि परीक्षांमधील अन्यायाविरोधातील ही लढाई अशीच सुरू राहील,” असा निर्धार त्यांनी आज सकाळीच व्यक्त केला होता. त्यातच आता लक्ष्मण हाके यांच्यासारख्या मोठ्या ओबीसी नेत्याचा पाठिंबा मिळाल्यामुळे या आंदोलनाला आता मोठी राजकीय ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






