Sonam Wangchuk : सोनम वांगचुक उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम !
अभिजीत दिपके आणि इतर आंदोलक ठिय्या देऊन आहेत. प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत; तोपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.

Sonam Wangchuk – शिक्षण आणि पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) मागण्यांना केंद्र सरकारने प्रतिसाद न दिल्यास २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा त्यांनी पुन्हा दिला आहे.
नीट आणि इतर परीक्षांच्या गोंधळावरून सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि इतर मागण्या सीजेपीने लावून धरल्या आहेत.
सीजेपीला पाठिंबा दर्शवत वांगचुक आंदोलनात सहभागीही झाले. त्यांनी याआधीच मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्याचा पुनरूच्चार त्यांनी गुरूवारी केला. मी स्वत: दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. ते शिक्षण आणि लडाखच्या पर्यावरणाशी संबंधित उत्तरदायित्वाविषयीचे आहेत.
सरकारच्या प्रतिसादाची मी २७ जूनपर्यंत प्रतीक्षा करेन. त्यानंतर पुढील दिवसापासून जंतर-मंतर परिसरात उपोषण सुरू करेन, असे त्यांनी व्हिडीओ संदेशातून स्पष्ट केले. सीजेपीने २० जूनपासून जंतर-मंतर परिसरात पुन्हा आंदोलन सुरू केले.
तेव्हापासून आंदोलनस्थळी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि इतर आंदोलक ठिय्या देऊन आहेत. प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत; तोपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.





