कोळसा गैरव्यवहार प्रकरण: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पुतण्याला EDचे पुन्हा समन्स

नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सक्तवसूली संचालनालयाने 29 मार्च रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स पुन्हा एकदा बजावले आहे. पश्चिम बंगालमधील कोळसा गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्डरिंगच्या अनुषंगाने होणाऱ्या चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणी बॅनर्जी यांचा जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस आहेत. याच प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अभिषेक बॅनर्जी यांची सोमवारी सुमारे 8 तास चौकशी केली होती. ही त्यांची चौकशी होण्याची दुसरी वेळ होती. सर्वात पहिल्यांदा गेल्या वर्षी त्यांची चौकशी करण्यात आली होती.
या प्रकरणातील अन्य आरोपींशी अभिषेक बॅनर्जी यांचे संबंध तपासून बघितले जात आहेत. आपण कायद्याचे पालन करणारे आहोत. म्हणूनच आपण चौकशीला सहकार्य केले असे बॅनर्जी यांनी सोमवारी प्रसार माध्यमांना सांगितले. ईडी, सीबीआय आणि प्राप्तीकर विभागासारख्या यंत्रणा भाजपाकडून विरोधकांना घाबरवण्यासाठी वापरल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.





