मोदी सरकारमुळे सहकार क्षेत्राला बळकटी : मोहोळ

पुणे – सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापन करून केंद्रातील मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत सकारात्मक आणि धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे व्यक्त केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . संस्थेमधील कृषी आणि कृषी क्षेत्राशी संलग्न अभ्यासक्रमाच्या 32 व्या तुकडीतील 99 विद्यार्थ्यांना मोहोळ यांच्या हस्ते पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
मोहोळ म्हणाले, “वैकुंठ मेहता सहकार संस्था ही सहकार क्षेत्रातील देशभरातील सर्वांत जुनी प्रशिक्षण संस्था आहे. भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्राचे योगदान मोलाचे राहिले आहे. या क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज वैकुंठ मेहता संस्था प्रभावीपणे पार पाडत आहे.
देशाचा सहकार वाढवण्यात प्रशिक्षित तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. भारताला विकसित बनवण्याच्या कार्यात तरुणांनी भरीव योगदान देण्याची आवश्यकता आहे. या वेळी संस्थेमधील आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद घडून यावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या एक्झिक्युटिव्ह एज या अॅपचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या संचालक डॉ. हेमा यादव यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले, तर कुलसचिव डॉ. ए. के. अस्थाना यांनी आभार मानले.





