मुंबई-गोवा महामार्गावर CNG टँकरची ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराला लागली आग

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळील बावनदी येथे सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या मिनी बसचा अपघात झाला आहे. आज (8 जून) सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या अपघातानंतर गळती झालेला सीएनजी हवेत पसरला आणि त्यात लागलेली आग एका घरापर्यंत पोहोचली. या दुर्घटनेत एक म्हैस भाजली असून, घराजवळची रिक्षा आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
याशिवाय अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना दुखापत झाली असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात घालवण्यात आले आहे. या ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे शिक्षक रत्नागिरीत एका प्रशिक्षणासाठी येत होते. या अपघातात 30 जण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
अपघातग्रस्त टँकर मुंबईच्या दिशेने जात होता आणि खासगी ट्रॅव्हल्स चिपळूणहून रत्नागिरीला येत होती. बावनादी येथे टँकरची खासगी ट्रॅव्हल्सला धडक बसली. ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्ता सोडून 20 फूट खाली गेली. त्यात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे सर्वच प्रवासी जखमी झाले आहेत. Mumbai Goa Highway Accident |
या अपघातामुळे टँकरची सीएनजी भरलेली टाकी रस्त्याच्या कडेला गटारानजीक पडली आणि त्यातून सीएनजीची गळती झाली. त्यामुळे त्या परिसरातील लोकांमध्ये खळबळ उडाली. हवेत पसरलेला सीएनजी अचानक पेटला आणि त्या आगीची झळ तेथील एका घराला बसली. सुदैवाने घरातील सर्व माणसांनी बाहेर पळ काढल्यामुळे जीवितहानी झाली नाही. Mumbai Goa Highway Accident |
अपघाताच्या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच टँकरमधील शिल्लक सीएनजी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या 4 ते 5 तासांपासून ठप्प आहे. संगमेश्वर आणि पाली मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. Mumbai Goa Highway Accident |
हेही वाचा:
Crime News : शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातून तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल





