Pune | सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ

पुणे, – पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात सीएनजीच्या दरात गुरुवारी (दि.२१) मध्यरात्रीपासून प्रतिकिलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सीएनजी दर आता प्रतिकिलो 87.90 रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेल्या दरामुळे सीएनजी वाहन चालकांच्या खिशावर ताण पडणार आहे. प्रवास महागणार आहे. पाईप्ड नॅचरल गॅसचे (पीएनजी) दर मात्र स्थिर आहेत.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिचवडसह चाकण, तळेगाव हिंजवडमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. कंपनीने गुरुवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दोन रुपये वाढ केली. याआधी गणेशोत्सवात (8 सप्टेंबरला) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 90 पैसे वाढ झाली होती. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो 85.90 रुपयांवर गेला होता. पुन्हा दरात वाढ झाल्याने सीएनजीचा किलोचा दर 87.90 रुपय झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने त्याची आयात महागली आहे. यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतही वाढत आहे. यामुळे सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर वाढ झाली आहे. यावर्षी जुलै महिन्यातही सीएनजीचे दर वाढले होते. इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत.
मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत. पुण्यात जुलैमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सीएनजीचा दर त्यावेळी प्रतिकिलो 85 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात 90 पैशांनी वाढ झाली होती. आता पुन्हा दोन रूपयांनी वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनाचालकांच्या खिशाला झळ बसत आहे.
शहरातील सीएनजीचे किलोचे दर
जुना दर 85.90 रूपये
नवीन दर 87.90 रूपये





