Pune : सीएनजीची पुन्हा दरवाढ

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुन्हा दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, १ रुपये १० पैसे प्रतिकिलो दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर ८९ रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. मागील दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, सततच्या वाढत्या दरामुळे सीएनजी वाहनचालकांच्या खिशावर ताण पडणार आहे.
एमएनजीएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडीमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. २१ नोव्हेंबर म्हणजेच एक महिन्यांपूर्वीच एमएनजीएलकडून सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. त्याआधी ८ सप्टेंबरला ९० पैशांनी वाढ केली. अवघ्या चार महिन्यांत तीन वेळा झालेल्या दरवाढीमुळे सीएनजी वाहनचालकांना चांगलाच भुर्दंड बसत असून, अशीच वाढ सुरू राहिली, तर सीएनजी आणि डीझेल, पेट्रोलच्या दरामध्ये फारसा फरक काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जागतिक ऊर्जा बाजारातील चढ- उतारांमुळे एमएनजीएलने हा निर्णय घेतला आहे. आपल्या मौल्यवान ग्राहकांच्या हिताचा सर्वोच्च विचार करत काळजीपूर्वक निर्णय घेतला आहे.
आयातीत नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि बाजाराच्या दरावर आधारित वायू पुरवठ्यामुळे एमएनजीएलसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे ही दरवाढ करावी लागली. ऑपरेशनल क्षमता आणि ग्राहकांच्या परवडण्याची शक्यता यांचा समतोल राखून ही दरवाढ केल्याचे एमएनजीएलकडून सांगण्यात आले आहे.
मागील चार महिन्यांत झालेली दरवाढ
तारीख झालेली वाढ सीएनजी दर
२७ डिसेंबर २०२४ १ रुपये १० पैसे ८९ रुपये
२१ नोव्हेंबर २०२४ २ रुपये ८७ रुपये ९० पैसे
८ सप्टेंबर २०२४ ९० पैसे ८५ रुपये ९० पैसे





