Maharashtra Election : ‘शिस्त पाळा अन्यथा…’, एकनाथ शिंदेंनी भरसभेत राणा दाम्पत्यांना दिला जाहीर इशारा

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अमरावतीच्या दर्यापूरमधील प्रचारसभेतून राणा दाम्पत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. महायुतीमध्ये राहून महायुतीविरोधात काम करणा-यांची नोंद घेतली जाणार असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“महायुती मजबूतीने लढत आहे. महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकण्यातं काम करु नका. मी राणा परिवारालाही सांगतो की, तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीत सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलं आहे. सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजीत अडसूळदेखील आपल्याला हवे आहेत. म्हणून आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचं आणि महायुतीच्या विरोधात काम करायचं हे कोणी करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणून मी हे आवाहन करत आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी दर्यापूरमधील सभेतनंतर शिवसेना पक्षाचे महायुतीतील अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. येत्या 23 तारखेला त्यांचे विमान विधानसभेत नक्की पोहचवा जेणेकरून दर्यापूरच्या विकासाचा टेक ऑफ घेऊ शकेल असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.





