भरत गोगावले यांना लागणार लॉटरी ! ‘या’ पदावर वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदासाठी आग्रही असणाऱ्या संजय शिरसाट, लोकसभेत तिकीट कापलेले हेमंत पाटील आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना विधानसभेच्या तोंडावर महामंडळांची अध्यक्षपदे देऊन खूश करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर आता ते भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा तसेच महामंडळांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद हे कॅबिनेट दर्जाचे पद आहे.
कोण आहेत भरत गोगावले ?
भरत गोगावले हे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांमुळे शिवसेनेत आले. महाडवर गोगावले यांनी सेनेचा भगवा फडकावला. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघातील सक्रियता ही गोगावलेंसाठी जमेची बाजू आहेत.पण पक्षांतर्गत बंडखोरी केल्याचा मुद्दा त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.गोगावले यांना मतदारसंघातील आगामी वाटचाल आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसच्या स्नेहल जगताप त्यांना तगडी फाईट देऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.





