उद्याच्या उद्या लक्ष्मण हाकेंच्या भेटीला शिष्टमंडळ पाठवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

जालना : राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणचा मुद्दा पेटताना दिसत आहे. मागच्या ६ दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृतीदेखील खालावली आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनदेखील केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले आश्वासन
मराठा आरक्षण देताना आपण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असं आश्वासन देत शुक्रवारी दोन मंत्र्यांचे शिष्टमंडळ उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
विजय वडेट्टीवार भावुक
उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेल्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काहीसे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हंटले कि, “ओबीसींच्या मागे उभे राहणे हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता येते आणि जाते, पदाचा मी कधीच विचार केला नाही. हे छत्रपती शिवरायांचे, शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. या पुरोगामीत्वाला धक्का लावण्याचे काम 2014 साली सुरू झालं. सरकारचे शिष्टमंडळ उद्या येणार आहे. लक्ष्मण हाकेंना पूर्ण अभ्यास आहे. सगेसोयऱ्यांचा विषय न्यायालयात टिकणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, मग त्याचा अध्यादेश कशाला काढताय. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहिले असून सामाजिक सलोखा उद्ध्वस्त होत आहे.” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.





