CM Fadnavis on Deshmukh murder Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेच्या काही महिन्यांनंतर आता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचे म्हटले आहे. हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ठाणे येथे प्रसार माध्यमांशी या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ‘आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी. उज्वल निकम यांची आपण नियुक्ती केली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कोर्ट कठोर शिक्षा देईल.’ असे ते म्हणाले. दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडी पोलिसांनी 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र केज कोर्टात दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कराडचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 असा करण्यात आला आहे.