वडगाव मावळ, (वार्ताहर) – पंढरीच्या पायी वारी करीत वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड सुरु ठेवणाऱ्या मावळ तालुक्यातील सुमारे पाच हजार स्त्री पुरुष वारकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन पोशाख प्रदान करीत आमदार सुनील शेळके यांनी समस्त वारकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार शेळके यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या श्री विठ्ठल परिवार मावळ, सकळ दिंडी नियोजन समिती यांच्या वतीने गेली काही वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आमदारांनी प्रत्येक गावात पोशाख पाठवून सन्मान केल्याबद्दल तालुक्यातील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज गायकवाड म्हणाले की, पायी वारीची परंपरा मावळ तालुक्यातील हजारो वारकऱ्यांनी आजही जपली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने मावळातील पाच हजार पुरुष महिला वारकऱ्यांना घरपोच पोशाख देऊन त्यांनी सन्मानित केले. खूप समाधान वाटले, अशा भावना श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंद नाना राऊत यांनी व्यक्त केली.