पुणे | पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे शहर सुन्न झाले आहे. रात्री उशिरा पब व बारमधून मद्यधुंद अवस्थेत तरुणाई बाहेर पडते आणि बेधुंदपणे वाहने चालवल्यामुळे असे प्रकार घडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व अनधिकृत पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावेत, अशी मागणी पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त व पुणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे
काही दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणाकडून बेदरकार पद्धतीने वाहन चालवून अपघात केल्यामुळे पुणेकर सुन्न झाले आहेत. याला पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब, बार कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरातील तरुणाई मोठ्या संख्येने याला बळी पडत असून, मद्यधुंद अवस्थेत पब व बारमधून बाहेर पडताना अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. पुणे शहर व जिल्ह्याचे समाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी शहरातील तरुणाईला व्यसनाधीनतेच्या विळख्यात टाकणाऱ्या या पब व हुक्का पार्लर संस्कृतीला तातडीने पायबंद घालणे अत्यंत आवश्यक असल्याचे भानगिरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.




