फडणवीसांनी दिलेली ‘ती’ क्लीप त्यांच्याच कार्यकाळातील; राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई – महाविकास आघाडी सरकार राजकीय विरोधकांविरुद्ध कट रचत असल्याचा आरोप करणारा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजच्या सत्यतेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक शाखेने बुधवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की फडणवीसांच्या या कथित व्हिडीओ क्लीपवर 1 जानेवारी 2019 अशी तारीख स्पष्ट दिसते आहे. त्या काळात खुद्द फडणवीसच मुख्यमंत्री होते. त्यामुळे महाविकास आघाडीने विरोधकांना अडकवण्याचे षडयंत्र रचल्याचे कुभांड उघडे पडले आहे असे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीची स्थापना त्यानंतर 11 महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती.
फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राइव्ह सादर केला होता आणि दावा केला होता की, फुटेजमध्ये पोलिस आणि महाविकास आघाडीचे सदस्य भाजप नेत्यांना खोटे अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या व्हिडीओ क्लीपचे खरे निर्माते दिग्दर्शक उघडे करण्याची गरज असून त्यासाठी आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहोत असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.





