पिंपरी | रेल्वे स्थानकात राबविले स्वच्छता अभियान

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड प्रवासी संघटनेच्या वतीने पुणे-लोणावळा परिसरातील रेल्वे स्थानके, लोकल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. चिंचवड रेल्वे स्थानकातील स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थिही सहभागी झाले.
चिंचवड रेल्वे स्थानकांचे फलाट, आरक्षण केंद्र व पश्चिमेकडील टिकीट घर व परिसरात स्वच्छता केली. यात प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड प्रवासी संघ, स्व. श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशन सहभागी झाले.
चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यु जॉर्ज यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता व शपथ सोहळा पार पडला. प्रतिभा महाविद्यालयाचे प्रा. सुखलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
चिंचवड प्रवासी संघाचे मुकेश चुडासमा, तसेच, स्व. श्रीमती दरूबाई सोशल फाऊंडेशनच्या निर्मला माने, दादासाहेब माने समवेत चिंचवड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक आर. के. तांबे, कर्मचारी मनोहर बोडके, अरविंद कुमार, किरण लगड उपस्थित होते.
आपण ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो. त्याप्रमाणे पुणे-लोणावळा परिसरातील रेल्वे स्थानके, लोकल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
प्रा. कुंभार, डॉ. दिपक शहा तसेच, प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले. रेल्वे स्थानक प्रमुख मॅथ्यु जॉर्ज यांनी रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छता केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





