Pune : ढोल-ताश्याच्या गजरात डेक्कन क्वीन रवाना

पुणे : विविध फुलांनी सजलेल्या दख्खनच्या राणीचा (डेक्कन क्वीन) ९५ वा वाढदिवस रेल्वे प्रवासी संघ आणि नागरिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून उपस्थितांनी एकमेकांना भरवत आनंद साजरा केला. ढोल-ताश्यांच्या गजरात डेक्कन क्वीन चाकरमान्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा, पुणे रेल्वे स्थानक संचालक संजय कुमार, पुणे रेल्वे स्टेशन व्यवस्थापक रवींद्र धुमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी रेल्वे प्रवासी ग्रुपचे सदस्य अॅड. आशुतोष रानडे, सीनियर एजीपी अॅड. संजय रायरीकर, गणपत मेहता आणि सुधीर शहा उपस्थित होते. पुणे-मुंबईतील चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या डेक्कन क्वीनने आता ९६ वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी डेक्कन क्वीनच्या चालकांचा सत्कार केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सकाळी सव्वा सातच्या सुमारास गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.





