Sant Tukaram Maharaj Palkhi : पावसातही अहोरात्र झटणारे ‘स्वच्छतादूत’
Sant Tukaram Maharaj Palkhi : पांडुरंगाच्या सेवेसाठी स्वच्छतेचा अखंड वसा

देहू : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आज देहूतून उत्साहात प्रारंभ झाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे ‘स्वच्छतादूत’ यांची निःस्वार्थ सेवा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
देहूपासून थेट पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी हे सेवाभावी कार्यकर्ते गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अखंडपणे पार पाडत आहेत. पावसामुळे रस्त्यांवर चिखल, साचलेले पाणी आणि कचरा निर्माण होत असतानाही हे स्वच्छतादूत कोणतीही तक्रार न करता सातत्याने स्वच्छता करताना दिसतात.
“जोपर्यंत अंगात शक्ती आहे, तोपर्यंत ही सेवा सुरूच ठेवणार,” अशी त्यांची भावनिक भावना आहे. त्यांच्या मते ही केवळ स्वच्छता नसून पांडुरंगाची सेवा आहे. या सेवेत मुंबई, डोंबिवली, कल्याण, शहापूर, भिवंडी तसेच इतर भागांतून आलेले स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
संपूर्ण टीम एकमेकांना सहकार्य करत काम करते. एखाद्याला दुखापत झाल्यास इतर सदस्य तत्काळ मदतीला धावून जातात. काही स्वयंसेवकांच्या पायांना जखमा झाल्या असतानाही त्यांनी सेवा थांबवली नाही. त्यांच्या संस्थेकडून आवश्यक साहित्य, सुविधा आणि वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली असून मेडिकल टीम सातत्याने स्वयंसेवकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.
या सेवेत सहभागी असलेले एक ज्येष्ठ स्वयंसेवक अनेक वर्षांपासून ही जबाबदारी पार पाडत असून, “हीच माझी विठ्ठल सेवा,” असे ते नम्रपणे सांगतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी निस्वार्थ भावनेने झटणारे हे स्वच्छता धूत पालखी सोहळ्याचे खरे अनामिक नायक ठरत आहेत.





