पुणे | वारकरी शिल्पांची स्वच्छता; सूर्यदत्त स्कूलच्या विद्यार्थ्यांचा बावधनमध्ये उपक्रम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नुकताच पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. यानिमित्त सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून बावधन परिसरातील वारकरी शिल्पांची स्वच्छता करण्यात आली.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या वारकरी शिल्प स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
स्कूलच्या संचालिका शीला ओक यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांसह शिक्षकही या उपक्रमात सहभागी झाले. रस्त्यातील कचरा उचलत स्वच्छता केली. वृक्षारोपण करून परतणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या कृतीचे कौतुक केले.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, वारकरी परंपरेत स्वयंशिस्त, नैतिक जीवन आणि अध्यात्मिक सत्याचा शोध दिसतो. नेहमीच्या आध्यात्मिक संकल्पनेपलीकडील अद्भुत दर्शन घडवणारी ही वारी आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे जतन आणि वारकरी संप्रदायाचा सामाजिक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, असा उद्देश या उपक्रमामागे होता. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, नैतिक वर्तन आणि कर्तव्यदक्षय जीवन याविषयी घोषणा देत पांडुरंगाचे भजन करत वारीचा अनुभव घेतला.





