आळंदी: नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छ केला इंद्रायणी घाट परिसर

आळंदी – शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसह नगराध्यक्ष, नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी हातात झाडू घेऊन इंद्रायणी घाट परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक यांसह अनेकजण उपस्थित होते.
मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी स्वच्छता अभियान विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन करीत वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी महाविद्यालय आणि नगरपरिषद आळंदी नेहमीच स्वच्छतेबाबत एकत्र काम करतात. याही वर्षी कार्तिकी यात्रेनंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी घाट परिसर स्वच्छ करून सामाजिक स्वच्छतेचा संदेश दिला. या कार्याचा आम्हाला अभिमान आहे असे मत मांडत विद्यार्थ्यांचे तसेच उपक्रमाचे कौतुक केले.






