Class 10 Student Stabbed Case : अहमदाबादेतील विद्यार्थी हत्या प्रकरणावरून वातावरण तापले; जमावाकडून तोडफोड

अहमदाबाद : येथील एका खाजगी शाळेतील कनिष्ठ इयत्तेतील विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याच्या विरोधात शुक्रवारीही निदर्शने सुरूच राहिली. विरोधी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आणि संस्था बंद करण्याची मागणी केली. ज्या शाळेत ही घटना घडली त्या सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनीही फलक हातात घेऊन निदर्शने केली आणि परिसरात चोरी, वाद आणि हाणामारीच्या घटना नियमित घडत असल्याच्या आणि तक्रारी असूनही निष्क्रियता दाखवली जात असल्याचा आरोप केला.
मंगळवारी झालेल्या किरकोळ हाणामारीत आठवीच्या विद्यार्थ्याने चाकूने भोसकलेल्या नयन संतानी या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जमावाने परिसरात तोडफोड केली.शाळेच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांशी त्यांची झटापट झाली. विश्व हिंदू परिषदेनेही निदर्शने केली. संघटनेने दिलेल्या बंदच्या आवाहनाअंतर्गत मणिनगर, खोखरा आणि इसनपूर भागातील सुमारे २०० शाळा बंद होत्या.
विद्यार्थी आणि पालकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. लाखो रुपये घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवत आहात? शाळा कधीच कोणतीही जबाबदारी घेत नाही. जर शाळा व्यवस्थापनाने योग्य पावले उचलली असती तर ही हत्या झाली नसती, असे एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की शाळेने वेळेवर रुग्णवाहिका बोलावली नाही आणि पुरावा नष्ट करण्याच्या कथित प्रयत्नात रक्ताचे डाग धुण्यासाठी पाण्याचा टँकर बोलावण्यात आला होता. शाळेच्या आवारात झालेल्या तोडफोडीप्रकरणी शाळा प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात ५०० हून अधिक लोकांवर दंगल, हल्ला आणि नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.





