मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला विधानभवनाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेने विधानभवन परिसरात खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण तापले आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात विधानभवनाच्या लॉबीत वाद उफाळला, जो हाणामारीत बदलला. कपडे फाटेपर्यंत चाललेल्या या राड्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, “पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. विधानसभेत आमदार सुरक्षित नसतील, तर आमदारपदाचा काय उपयोग? मला आणि माझ्या आई-बहिणींवर शिवीगाळ झाली. हे गुंड मलाच मारण्यासाठी आले होते.” त्यांनी धमकीचे मेसेजही दाखवले, ज्यात “गोपी साहेबांशी पंगा घेऊ नका, गोळ्या घालू” असे लिहिले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. फडणवीस यांनी घटना चुकीची असल्याचे सांगत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापतींनी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. नार्वेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. उद्धव ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत, “ही समर्थक आहेत की गुंड? ज्यांनी पास दिले, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. गृहमंत्र्यांनी गुंड आणि त्यांच्या पोशिंद्यांवर कारवाई करावी,” असे म्हटले. दरम्यान, पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त करत, “ही घटना दुर्दैवी आहे. विधानभवनाच्या आवारात असे प्रकार शोभत नाहीत. मी याबाबत नेत्यांशी चर्चा करेन,” असे सांगितले. मात्र, त्यांनी हाणामारीबाबत अनभिज्ञता दर्शवली. या घटनेने विधानभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर गुंडगिरीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे, तर सत्ताधाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. याप्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे.