CJP workers: जयपूरमध्ये शाळेबाहेर राडा! आशुतोष रांकासोबत बाचाबाची, CJP कार्यकर्त्यांना गावकऱ्यांची मारहाण
CJP workers: राजस्थानची राजधानी जयपूरमधील बागरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या अवस्थेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

CJP workers: राजस्थानची राजधानी जयपूरमधील बागरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या अवस्थेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या CJP कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी विरोध केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आणि वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी केला आहे.
CJP च्या ‘शाळा सुधारा’ मोहिमेअंतर्गत कार्यकर्त्यांचे पथक रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेत पाहणीसाठी पोहोचले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीला गावकऱ्यांनी विरोध केला आणि कार्यकर्त्यांना त्याठिकाणावरून जाण्यास सांगितले. काही वेळाने आशुतोष रांका स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरण आणखी तापले.
यानंतर दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची आणि झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. CJP कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा, तसेच त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप रांका यांनी केला आहे. या घटनेनंतर कार्यकर्त्यांना गावातून बाहेर काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
आशुतोष रांकांचा गंभीर आरोप CJP workers:
घटनेनंतर आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या प्रश्नावर पाहणी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या टीमला विरोध करण्यासाठी काही लोकांना गावात आणण्यात आले होते. या लोकांचा संबंध स्थानिक भाजप नेत्यांशी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Ashu has been attacked by BJP goons in Rajasthan.
Ashu and other volunteers of CJP were beaten up and have been injured.@PoliceRajasthan has allowed this to happen. pic.twitter.com/pc7c3GCAfV
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 21, 2026
रांका यांनी म्हटले की, सरकारी शाळांची दुरवस्था दूर करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जात आहे. मुलांना योग्य शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी आवाज उठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेवर अभिजीत दीपके यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी राजस्थानमध्ये आशुतोष रांका यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
गावकऱ्यांचा वेगळा दावा
मात्र, गावकऱ्यांनी CJPच्या आरोपांना विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शाळेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नाचा राजकीय मुद्दा बनवू नये, अशी त्यांची भूमिका आहे.
गावकरी विष्णू कुमार शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी या ठिकाणी पाचवीपर्यंतची प्राथमिक शाळा होती. त्यांच्या आजोबांनी शाळेसाठी जमीन दान केली होती. शाळेची इमारत १९९९ मध्ये बांधण्यात आली होती; मात्र त्यानंतर तिची आवश्यक दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील एका मोठ्या इमारतीत दोन खोल्यांमध्ये सध्या दोन शिक्षक सुमारे २० ते ३० विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
शाळेच्या नव्या इमारतीची मागणी CJP workers:
शाळेची दुरवस्था लक्षात घेता नवीन इमारत बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. बागरू विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. कैलाश वर्मा यांनी शाळेसाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झाले नसल्याचा दावा गावकऱ्यांनी केला.
गावकरी राजेश कुमार शर्मा यांनी CJPच्या कार्यकर्त्यांच्या भेटीला विरोध केला. त्यांच्या मते, शाळेच्या प्रश्नावरून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने शाळेची नवीन इमारत लवकरात लवकर उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.
गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, शाळेसाठी जमीन त्यांच्या पूर्वजांनी मुलांच्या भविष्यासाठी दान केली होती. त्यामुळे शाळेची इमारत पुन्हा उभारणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे रामपुरा-कंवरपुरा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेच्या प्रश्नाला आता राजकीय रंग मिळाला आहे. एकीकडे CJPने कार्यकर्त्यांना झालेल्या कथित मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे गावकऱ्यांनी शाळेची दुरवस्था दूर करून नवीन इमारत उभारण्याची मागणी लावून धरली आहे.





