CJP protest: हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय ; CJP आंदोलनप्रकरणी 5 गुन्हे दाखल
CJP protest: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत आहे.

CJP protest: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत आहे.
20 जुलै रोजी पक्षाने संसदेकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. दुसरीकडे, आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला आणि हिंसाचार झाल्याचा दावा करत दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी कनॉट प्लेस, पार्लमेंट स्ट्रीट आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत पाच एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. (CJP protest)
पोलिसांच्या आकडेवारीनुसार, आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत 118 पोलीस कर्मचारी जखमी झाले, तर लाठीचार्जमध्ये 60 आंदोलक जखमी झाले. याशिवाय 70 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. (CJP protest)
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गाझियाबाद पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यूपी गेट, महाराजपूर, सीमापुरी आणि भाऊपुरा सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, CJPचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलकांवर निर्दयपणे लाठीचार्ज करण्यात आला, अनेक तरुणांना मारहाण करून त्यांची डोकी फोडण्यात आली आणि त्यांना रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले, असा दावा त्यांनी केला. तसेच, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशीही गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला.
सीजेपीने सोनम वांगचुक यांची सुटका, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.






