पाकिस्तानात निवडणूक न झाल्यास गृहयुद्ध : शेख रशीद अहमद

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये तातडीने निवडणूक न झाल्यास गृहयुद्ध सुरु होऊ शकते, अशी भिती पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी वर्तवली आहे. तसेच इम्रान खान हे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भेटण्यास तयार आहेत. त्यांना शरीफ यांना भेटून देशात लवकरच निवडणूक घेण्याबाबत चर्चा करायची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष मे महिन्याच्या अखेरीस इस्लामाबादच्या दिशेने लॉंग मार्च काढेल आणि निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध होऊ शकते. इम्रान खान यांनी अलीकडेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
रशीद म्हणाले, ते पीटीआय आणि लष्करामधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच मी लष्करासोबत शांततेच्या बाजूने आहे. पण युद्ध झाल्यास मी इम्रान खान यांच्या पाठीशी उभा राहीन. लष्कराने लोकशाही बळकट होण्यासाठी काम केले पाहिजे आणि ती टिकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुदतपूर्व निवडणुका. निवडणुका लवकर झाल्या नाहीत तर शाहबाज शरीफ यांचे सरकार टिकणार नाही.





