नवी दिल्ली – सध्या कोविड काळानंतर विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत असून विमान इंधनाचे वाढते दर विमान कंपन्यांना परवडनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आठ राज्यांना त्यांच्या राज्यातील विमान इंधनाच्या दरात कपात करण्याचे आवाहन केले आहे. ते राष्ट्रीय राजधानीत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत बोलताना म्हणाले.
देशांतर्गत हवाई वाहतूक कोविड पूर्वकाळाच्या पातळीवर पोहोचत आहे. अलीकडच्या काळात, दररोजच्या प्रवासी संख्येने दोन वेळा चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
शिंदे म्हणाले की, जेट इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) अजूनही आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20-30 टक्क्यांच्या श्रेणीत आहे. (Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia urges 8 states to cut down tax on jet fuel) त्यांनी हे दर कमी करण्याची गरज आहे. या आठ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.
मंत्र्यांनी गोवा, आसाम, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार आणि तामिळनाडू यांना एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील (एटीएफ) व्हॅट कमी करण्याची विनंती केली. सध्या, 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जेट इंधनावर 1 ते 4 टक्के व्हॅट आहे.