नगर | जामखेड येथे शिक्षिकेच्या घरी चोरी सव्वा लाखांचा ऐवज लंपास

जामखेड – जामखेड शहरातील करमाळा रोडवरील शिक्षिकेच्या घरात रात्री चोरी होऊन 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. तसेच घरातील टीव्हीची देखील मोडतोड केली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांत चार वेळा याच घरात चोरी झालेली आहे. मात्र, कोणत्याही चोरीचा तपास लागलेला नाही.
शिक्षिका आशा किसन उदावंत (रा. सोनेगाव, ता. जामखेड) यांनी फिर्याद दिली. जामखेड शहरातील करमाळा रोडवरील गुगळे नर्सरीसमोर मी व आई असे एकत्र राहतो.सोनेगाव येथे शिक्षिका म्हणून नोकरी करतात. पती बीड येथे राहतात. मी सुट्टीच्या दिवशी जामखेड येथे येत असते. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता मी व माझी आई घराला कुलूप लावून माझा भाऊ राजेंद्र उदावंत याचे घरी महावीर मंगल कार्यालय समोर, जामखेड येथे गेलो होतो.
त्यानंतर जेवण करून तेथेच झोपलो. दुसर्या दिवशी सकाळी दि.1 सप्टेंबर रोजी घरी गेलो असता मला गेट तुटलेले दिसले. घराचा दरवाजाचे कुलूप व कडी कोंडा तुटलेला दिसला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटाने नुकसान करून सामान अस्तव्यस्त पडलेले होते. टी.व्ही. फुटून नुकसान करण्यात आले. पर्समधील 1 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व पैसे चोरुन नेले.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.





