नगर – नगर महापालिकेच्या पथविक्रेता समितीची प्रथमच निवडणूक होणार आहे. शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. शहरात महापालिकेकडे २ हजार ८९८ नोंदणीकृत फेरीवाले व पथ विक्रेते आहेत. शहरातील फेरीवाला धोरण निश्चित करून जागा उपलब्ध करणे, इतर सुविधा, योजनांचा लाभ देणे यासाठी ही समिती काम करते. यापूर्वी समितीत फेरीवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून काही संघटनांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली होती. आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार फेरीवाल्यांचे आठ प्रतिनिधी समितीत घेतले जाणार आहेत. २० सदस्यांच्या समितीत १२ सदस्य हे शासकीय अधिकारी, प्रतिनिधी असून इतर आठ जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या दि. १२ ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतर दि. १३ ते १६ ऑगस्ट या काळात उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करणे, दि. १९ ऑगस्ट रोजी छाननी, दि.२० ऑगस्टपर्यंत माघार, २३ ऑगस्ट रोजी मतदान व त्यानंतर मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया नगर महापालिकेच्या मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे.