नगर | मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

नितीन शेळके
श्रीरामपूर -काँग्रेसने आज जाहीर केलेल्या २३ उमेदवारांच्या यादीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारासंघाचे आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात संघर्ष करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे समर्थक प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना काँग्रेसची उमदेवारी जाहीर झाल्यानंतर आ.कानडे हे तातडीने मुंबईला रवाना झाले असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतरही गाठीभेटी घेणार असून, त्यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
घराणेशाहीच्या ताब्यातून काँग्रेस पक्ष संघटना मुक्त करून तळागाळापर्यंत आपण पक्षाची उत्तम संघटना बांधली. श्रीरामपूर तालुक्यातील जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा की, पुन्हा एखाद्या घराण्याचा घरगडी निवडून द्यायचा, याचा फैसला इथली जनताच करेल,अशी जळजळीत प्रतिक्रिया आमदार लहू कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी नाकारल्याच्या निर्णयावर व्यक्त केली. तातडीने आपल्या काही निवडक कार्यकर्त्यांसमवेत मुंबईकडे कूच केली. तसेच आपण दि.28 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली असून, त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळेल का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेच्या गोटातून मात्र कुणीही यास दुजोरा दिलेला नाही. तसेच पक्षश्रेष्ठींबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटताना दिसत आहे.
आ.कानडे यांच्या पक्ष प्रवेशाला स्थानिक शिवसेनेच्या संघटना व कार्यकर्ते यांचा विरोध नसला तरी त्यांच्या उमेदवारीला मात्र तीव्र विरोध होताना दिसत आहे. . आ.कानडे हे मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समजताच स्थानिक शिवसैनिक मा. खा.सदाशिव लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयात जमा होण्यास सुरुवात झाली. त्यांनी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून, त्यात कानडे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला, त्यांना उमेदवारी मिळाली तर पुढील रणनीती काय असेल यावर चर्चा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मात्र त्यांच्या प्रवेशाविषयी चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती.





