PMRDA Certificates: पीएमआरडीएची प्रमाणपत्रे आता एका क्लिकवर!
PMRDA Certificates: झोन, पार्ट प्लॅन अन् साइट एलिव्हेशन प्रमाणपत्रे काही सेकंदांत मिळणार

पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरिकांना दिलासा देणारे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
प्राधिकरणाच्या जीआयएस आधारित जिओ पोर्टलद्वारे आता झोन प्रमाणपत्र, पार्ट प्लॅन आणि साइट एलिव्हेशन प्रमाणपत्र ऑनलाइन स्वयंचलित पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रांसाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आणि अनेक दिवस प्रतीक्षा करण्याची गरज कमी होणार आहे.
‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ आणि शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रमांतर्गत ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. यापूर्वी झोन प्रमाणपत्रासाठी सात दिवस, पार्ट प्लॅनसाठी तीन दिवस, तर साईट एलिव्हेशन प्रमाणपत्रासाठी दहा दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया काही सेकंदांत पूर्ण होणार आहे.
पीएमआरडीएने १९९७ मध्ये मंजूर झालेल्या पुणे प्रादेशिक योजनेचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करून ती भौगोलिक माहिती प्रणालीशी (जीआयएस) जोडली आहे.
साईट एलिव्हेशन प्रमाणपत्रासाठी डिजिटल उंची प्रतिमाने, स्थलाकृतिक नकाशे आणि भौगोलिक माहितीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. तसेच झोन प्रमाणपत्रासोबत पार्ट प्लॅनदेखील मिळणार आहे.
या पोर्टलवरून नागरिकांना घरबसल्या अर्ज करता येणार असून, प्रमाणपत्रांवरील क्यूआर कोड आणि बारकोडच्या मदतीने त्यांची सत्यता पडताळता येईल.
पोर्टलवर ६७४ गावांच्या हद्दींसह मेट्रो मार्ग, टीओडी क्षेत्र, पुरंदर विमानतळाचे बाधित क्षेत्र, एनडीए बफर झोन, रेल्वेमार्ग, वन्यजीव अभयारण्यांच्या सीमा आणि पूररेषा अशा २५ हून अधिक भौगोलिक स्तरांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पीएमआरडीएचे हे डिजिटल मॉडेल राज्यातील अन्य प्रादेशिक विकास प्राधिकरणांसाठीही मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे.
पीएमआरडीए आयुक्त डाॅ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नियोजन आणि विकास प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्यासाठी हे पोर्टल महत्त्वाचे पाऊल आहे.
नागरिकांना भूखंड परिसरातील रस्ते, पूररेषा, मेट्रो मार्ग आणि प्रादेशिक नियोजनाची प्राथमिक माहिती एका क्लिकवर मिळेल.
Pune District : रांजणगाव विविध विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनिल खेडकर यांची बिनविरोध निवड





