पुणे जिल्हा | नागरिकांना कायद्याची ओळख असावी

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – विद्यार्थी व नागरिकांनी समाजात वावरताना कायद्याचे पालन करणे अपेक्षित असून त्यासाठी त्यांना कायद्याची ओळख असावी, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी केले.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खेड तालुका विधी सेवा समिती व खेड तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश सय्यद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. पोळ, ए.ए.घाणिवाले, दिवाणी न्यायाधीश पी.एस. इंगळे, ए. बी. होडावडेकर, ए. एम. हुसेन, एस. बी. पवार, सरिता विश्वंभरन, एस. बी. नाईकनवरे-गरड, जे. व्ही. मस्के, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव,
खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रोहीदास टाकळकर, उपाध्यक्ष अॅड. अमोल तळेकर, संस्था संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, ड. बाळासाहेब लिंभोरे, ड. देविदास शिंदे, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, खेड बार असोसिएशनचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
न्यायाधीश एस.एस.सय्यद यांनी बोलताना संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक कायद्यांविषयी माहिती दिली. कुठलीही गोष्ट अशक्य नाही, मनापासून अभ्यास करा, स्वप्न उंच ठेवा आणि त्याच्या पूर्तीसाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
न्यायाधीश एस.बी. नाईकनवरे – गरड यांनी विधी साक्षरता या विषयावर माहिती देताना विद्यार्थ्यांना विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करण्याचे आवाहन केले. न्यायाधीश एस. विश्वंभरन यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वोत्तमाचा ध्यास घ्या. समाजाभिमुख व्हा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
अॅड. निलेश चौधरी यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायद्याची माहिती सांगून लैंगिक शिक्षणाची गरज व्यक्त केली. या कायदेविषयक जनजागृती शिबिरात रॅगिंग, बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. प्रास्ताविक अॅड. रोहिदास टाकळकर, सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे तर अॅड. संदीप घुले यांनी आभार मानले.





