तळेगाव दाभाडे – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी (दि. ७ मे) विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल घेण्यात आले. पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या मॉक ड्रिल अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मॉक ड्रिल घेण्यात आला. या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण देणे हा होता. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीने तळेगाव नगरपरिषद येथे बुधवारी (दि. ७ मे) दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आला. मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिके करण्यात आली. केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आदी घटक मॉक ड्रीलमध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनकर, डीसीपी विशाल गायकवाड, एसीपी सुनील कुराडे, विशाल पाटील, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, बीडीओ कुलदीप प्रधान, आरोग्य अधिकारी सॅमसन सोनवणे, बी. आर. पाटील हे अधिकारी उपस्थित होते. तर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील, रुग्णवाहिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांचे अग्निशमक दल यांसह एनडीआरएफ, आरसीपी पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए पथक, होमगार्ड, आरोग्य सेवा परिमंडळ, पोलीस बंदोबस्त तैनात होता. मॉक ड्रिलचा उद्देश सफल – मॉक ड्रिलचा उद्देश हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजविणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे, शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. तळेगाव येथे मॉक ड्रिल पूर्ण झाल्यानंतर उपस्थित नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.