वॉशिंग्टन – माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील निर्णय फिरवून नवीन अध्यक्ष बायडेन यांनी युरोप आणि ब्राझील मधील नागरीकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी आदेश लागू केला आहे. त्या देशांमध्ये निर्माण झालेल्या करोनाच्या नवीन विषाणुंचा अमेरिकेतील फैलाव रोखण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केली आहे.
अमेरिकेच्या वैद्यकीय यंत्रणांनी तसा सल्ला प्रशासनाला दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती व्हाइट हाउसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. करोनाच्या नवीन विषाणुंचा फैलाव वेगाने होत असल्याने प्रवासावरील निर्बंध उठवणे धोकादायक आहे याची नवीन प्रशासनाला जाणिव आहे असे त्यांनी म्हटले आहे.अमेरिकेत नुसती प्रवास बंदी करून करोना आटोक्यात येणार नाही तर त्यासाठी वैयक्तिक निर्बंधही पाळणे अगत्याचे ठरले असल्याने त्या अनुषंगानेही उपाययोजना सुरू आहे असे त्यांनी सांगितले.